← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · २६ सप्टेंबर २०२६ · ५ मिनिटे वाचन

व्यापारी पेठ

आम्ही दोघे, म्हणजे बायको आणि मी, दादरच्या पारंपरिक मॉल मध्ये परवा गेलेलो. दादरची व्यापारी पेठ. रानडे रोडच्या व्यापारी पेठेबद्दल दादरकरांच्या मनात एक वेगळा जिव्हाळा आहे. माझ्या लहानपणी म्हणजे शाळेत असताना मला आई घेऊन जात असे. तिथे आईच्या माझ्या ओळखीचेही एखाद दोन दुकाने थाटायचे. घरगुती वस्तूंचा, छोट्या व्यापाऱ्यांचा तो मेळावाच असायचा नि आहे. पण आता चेहेरे वेगळे दिसतात. ओळखीचे कोणीच दिसत नाही. काही वेळेला नाही का आपण चेहेऱ्याने ओळखतो तसेही आधी दिसायचे. पण आता मात्र एखादा भय्याही व्यापारी पेठेत पापड विकताना दिसला तर वावगं नाही.

तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टी संध्याकाळी रिचवता रिचवता मी बायकोच्या मागे खांद्यावरच्या एका पिशवीमध्ये छोट्या खरेदीच्या पिशव्या गोळा करत करत चाललेलो.
व्यापारी पेठेतल्या वळणा वळणाच्या वाटेवरून अर्ध्या रस्त्यावर येऊन आम्ही थांबलो. कारणही तसंच होतं. एका कठीण प्रश्नांची चाहुल मला लागली.

बायकोने विचारलं, “त्या मागच्या दुकानात तु one piece बघितलास ना?”
मी म्हटलं, “तो घरात घरात घालायचा ? ज्या दुकानात मी तुला पॅन्ट दाखवल्या आणि तू हुं S करून पुढे गेलीस. ते ?
बायको ने नाक मुरडून मान डोलावली “हो तेच, चल तिकडे“
मग आम्ही दोघे परत मागे वळून त्या दुकानापर्यंत गेलो.

कपड्यांच्या बाबतीत मी दिलखुलास मत देतो बायकोला. ती पण मला नेहेमी विचारते. हे बरंय,ते चांगलंय वगैरे वगैरे आमचं चालू असतं…

बायको माझ्याबरोबर दुकानाजवळ आली. मग ती आणि दुकानदारीण ह्याच्यात शाब्दिक देवाण घेवाण झाल्यावर कपड्यांचे ढीग जमा व्हायला लागले. आता मी पुर्णपणे दुर्लक्षित होतो. बायको फर्माईश वर फर्माईश झाडत होती. दुकानदारीण युवती पण फटकार लावत होती. थोडा वेळ हे टेबल टेनिस, फुटबॉल, डोंगराला आग लागली पळा पळा असे कपड्यांचे खेळ रंगात आलेले मी पाहिले की मला मनात हर्षवायू होतो. मग बायकोला पण माझ्या वर्तणुकीतले हे बदल जाणवायला लागतात.
अजुन थोड्या वेळाने मग तिने दुकानदार तरुणीच्या बाजूला हँगर-वर लावलेला one piece वर बोट दाखवून म्हटलं “तो बघू“.दुकानदार युवतीने पण तो ड्रेस आदबीने काढून तिच्या हातात ठेवला. इथे मुद्दाम लक्षात ठेवा दुकानदाराच्या लेखी त्याच्या सामानाची, जिन्नसांची, पदार्थाची किंमत कितीही असो, त्या पेक्षा त्यांनी दाखवलेल्या आदबीला जास्त महत्त्व असते. हे असं दुकानदार आणि गिऱ्हाईकाचं आदरातिथ्य अत्यंत नयनरम्य असतं.

मग अश्या वेळी आपण दोन पावलं मागे जायचं, एक चार पायाची बैठक हाती लागली कि बसायला मिळतं. मग आता खरी मजा. मग बाजुचा एखादा पुरुष दुकानदार तुमच्याकडे स्मितहास्य करून तुम्हाला चहा देत असेल तर वा !! कायच बोलावे!!! मग त्या अवलिया बरोबर आपण जी स्मित हास्याची देवाण घेवाण करतो ती म्हणजे, अवघाचि संसार सुखाचा करीन… किंव्वा तत्सम अभंगच या भावानेच नितांत आर्त वर्णन करू शकतो.

असो पण बायको आणि दुकानदारीण युवती, ह्यांचं आदरातिथ्य चालु असतांना कपडे खरेदी मधील एक रामबाण अस्त्र त्या युवतीने बाहेर काढलं. ते शस्त्रच इतकं धारदार आहे की कितीही सुखवस्तू असो वा नसो, चाळीशी तिशीच्या पुढची स्त्री ह्या शस्त्रासमोर घायाळ समजा. ह्यापुढे त्यांना खरेदी शिवाय पर्याय नसतो. शस्त्रच तसं आहे. दुकानदारीण युवतीने विचारलं, “तुम्ही ट्राय का नाही करतं ?”.

ह्या प्रश्नाने तुम्हां पुरुषांना जेवढे प्रश्न पडले तेवढेच मलाही पडले, कदाचित मला जास्तच पडले.
१. इथे ?
२. दादरच्या व्यापारी पेठेत ?
३. कुठे ट्राय करणार ?
४. मग दुकानासमोर मी काय करायचं ?
वगैरे वगैरे …

मग बायकोने स्मार्टपणा दाखवीत सांगितलं, “ट्रायल नको हो, घाम आलाय नं, पण धुतल्यावर आळणार नसेल तर सांगा.”
मला मनात उमगलेलं, ही दुकानदारीण भलतीच स्मार्ट आहे. “ट्राय करा“ शस्त्र बळावर कितीतरी मुडदे खच पडलेले मला तिच्या रिकाम्या होणाऱ्या कपड्याच्या कप्प्यांमध्ये दिसले. मला तर आता वाटायला लागलं कि हा नुसता रामबाण उपाय नाही तर गुगली रामबाण आहे. कारण दादरच्या व्यापारी पेठेत घामट न होता कोण पोचू शकेल? आणि एखादी उच्चभ्रु स्त्री पोचलीच तर गर्दीत कोण कपडे ट्राय करेल ? पण बायकोने नको म्हणुन सावरलं आणि मी उसासा दिला.
आता मी पण बायकोच्या मनातला विचार अश्या वेळी लगेच ओळखतो. तिच्या मनात असतं, ‘खरेदी काय करायचं बरं, एवढं बघुन झालं’. बायकोने आता शास्त्र टाकलेली. तिच्याकडे आता काहीच शस्त्र उरलंच नव्हतं, बाण संपलेले. भीष्म पितामहांसारखी ती एकेका दुकानासमोर झुंजत होती. मी तीच सारथ्य करत होतो. पण दुकानदारीण युवती शुरवीर अर्जुनासम होती. अर्जुनाने ह्या भीष्माला आता शर-शय्येवर झोपवावं तसा प्रसंग उभा होता माझ्या समोर. मग त्या अर्जुनाने ह्या भीष्माला पाणीही पाजलं. माझ्या डोळ्यातही एक टिपुस आलंच. फारच भावनिक दृष्य होतं ते. बायकोने मग अनन्य साधारण वैराग्य भावनेने त्या दुकानदारीण युवतीला विचारलं “हा रंग बघु” माझ्याकडे ही बघितलं. मी ही बायकोची ही दयनीय अवस्था बघुन म्हटलं “अगं, आत्ताही तु ह्याच रंगाचं घातलं आहेस !!” असं म्हणुन मी युवतींकडे पाहिलं. तिच्या (अर्जुनाच्या) डोळ्यात आता मला दयाभावना दिसत होती. भीष्माचा पराभव झालेला. ती युवती हसली. मी बायकोला म्हटलं “घे आता हे! मला भुक लागली आहे”. बायकोने G-Pay केलं नि आम्ही बाहेर पडलो.

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.