← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · ६ जुलै २०२३ · ३ मिनिटे वाचन

तिसरे सेमिस्टर

गीता आणि विवेक

विवेक इंजिनीरिंग च्या दुसऱ्या वर्षाला होता. मागच्याच आठवड्यात त्याचं कॉलेज सुरु झालेलं. चौथं सेमीस्टर. पहिले तीन सेमीस्टर त्याने नुसतेच वर्गात बसून पाट्या टाकून काढले. पण आता त्याला पुस्तके परीक्षा, प्रोफेसर काय शिकवतायत हे कळू लागलं होतं. तसा विवेक शाळेत, बारावीपर्यंत ढ नव्हता पण वर्गात नंबरात पण येत नव्हता. “Above average” म्हणता येईल. क्लास न लावता त्याला अभ्यास करता येत होता. पण इंजिनीरिंग मध्ये आल्यावर सगळेच नवीन. परीक्षा पद्धती, पुस्तके, अभ्यास करण्याची पद्धत सगळेच नवीन. हे सगळे त्याला पहिले तीन सेमिस्टर जरा जड गेले. आता मात्र त्याला समजू लागलं होत. तिसऱ्या सेमिस्टर मध्ये त्याने स्वतःच्या नोट्स पण काढल्या होत्या. पण आता तो वर्गाच्या मागे नव्हता.

आता विवेक पुढच्या २-३ बेंच वर बसू लागला, मुलिंच्या जवळ. कॉलेज मधल्या मुली पहिल्या दोन तीन बेंच वर बसायच्या. विवेक आधी लाजायचा. एक तर प्रोफेसर काही विचारतील आणि मुलींसमोर आपलं हसं होईल म्हणून तो शेवटी यायचा आणि मागच्या बेंच वर बसायचा.

गीता आणि त्याची ओळख ऍडमिशन पासूनची दोघांनी एकाच दिवशी ऍडमिशन घेतलेली. जेव्हा त्याला कळलं कि तिने पण कॉम्प्युटर्स ला ऍडमिशन घेतलीये तेव्हा मात्रं त्याला आतून आनंद नाही पण तिच्याबद्दल उत्सुकता वाढली. ओळख आतापर्यंत नुसतीच हाय-हॅलो पर्यंत होती. पण आता तिच्या मागच्या बेंच वर तो बसला होता. तिने मागे वळून हाय केलं आणि विवेक किंचितसा गालात हसला आणि हात पुढे केला. मग तिने बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणीची पण ओळख करून दिली. पण त्याच लक्षच कुठे होत. त्याने अजून हातच सोडला नव्हता. दोन सेकंड नुसताच पाहत राहिला आणि मग कावरा बावरा होऊन त्याने गीताचा हात सोडला. ती पण गालात हसून पुढे वळली.

आता त्याला काहीतरी विषय काढून तिच्याशी बोलायचं होतं. काय बरं बोलावं अश्या विचारात तो गुंतला. कुठे राहते? … नको, घरी कोण असते? … अजिबात नको. शेवटी त्याने धडधडत्या छातीने तीला विचारलं तुला प्रोग्रामिंग येतं ? विवेक ने बारावीत बियॉलॉजि सोडून कॉम्पुटर सायन्स घेतलेलं. कॉम्पुटर आवडतं म्हणून नव्हे तर बियॉलॉजि नको म्हणून.
गीता ने मागे वळून बघितलं, विवेक कडे पाहून ती म्हणाली “नाही नं“. “पाहिलं सेमिस्टर कसं बसं केलं”. विवेक लगेच म्हणाला “ते सोप्पं पण होतं ना !” आणि पटकन गप्प झाला. लगेच त्याच्या लक्षात आलं, त्याला असं बोलायला नको होतं. मग त्याने सारवायचं म्हणून म्हटलं “मी बारावीत कॉम्पुटर घेतलेलं ना, म्हणून मला एवढं काही कठीण नाही गेलं”. ती म्हणाली “हो का !”. तेवढ्यात प्रोफेसर आले. सगळं वर्ग एकदम शांत झाला. गीता पण पुढे वळली. विवेकने बॅगमधून डेटाबेसच पुस्तक बाहेर काढलं आणि परत गीताशी पुढे काय बोलायचं या विचारात तो गुंतला.