← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · ६ ऑक्टोबर २०२० · ४ मिनिटे वाचन

पोस्टमन

दुपारच्या वेळेला दार वाजलं की “कोण झोपेच्या वेळेला कड्या वाजवतंय” अश्या आवेषात आई उठते. पोस्टमन दिसल्यावर मात्र त्यांना खुर्ची वगैरे देऊ करते, “बसा, पाणी देऊ?“. “नको, बसत नाही अजून बरंच फिरायचंय” असं म्हणून, कुठलंतरी मासिक नाही तर पाक्षिक दारात, खिडकीत अडकवून भराभरा दुसऱ्या घराकडे वळतील. बदलापूर ला आमचं एक बंगली वजा घर आहे वडिलांनी बांधलेलं, माझ्या जन्माच्या आधी. पोस्टमनही बदलापूरवासी म्हणून ते आमचे ग्रामबंधू, खास. हाती लिहिलेली पत्रं तर झाली इतिहास जमा, पोस्टमन मात्र राहिला …. उपकारापुरता. नव्हे त्याचेच आपल्यावर उपकार जास्त. मग पत्र असोत वा नसोत ते आमच्या दाराची कडी मात्र वाजवतात.

बोलता बोलता त्या दिवशी बोलून गेले, आता वय झालं, ऊन्हात फिरताना कधी bp वाढतं मग गोळी जवळ ठेवावी लागते. आम्ही चाळीत राहतो म्हणून दारं वाजवायची आणि जोशीSS, आपटेSS अशी आरोळी द्यायची सोय आहे. इमारतीत तर watchman च सांगतो “लेटरबॉक्स मे छोड देना”. आता या नेपाळी किंवा भय्या वॉचमनला मराठी नावे घ्यायची पंचाईत. देशपांडे म्हणजे आपलेच पांडेसदृश कोणीतरी असं वाटणाऱ्या त्याला हा मराठमोळा पोस्टमन काय नाव-पत्ते विचारणार. तो पत्रे लेटरबॉक्स मध्ये टाकून “थोडा पानी मिलेगा, भय्या” विचारून मार्गस्थ होतो.

तळेगावला त्यांच्या मुलाची जागा आहे, पण जाता येत नाही. मुलगा कसल्याशा फॅक्टरीत कामाला आहे. त्याला जागा घेताना मदत त्यांनीच केली. सणासुदीला मात्र तो आवर्जुन बोलावतो घरी. त्यांना एक मुलगी पण आहे. मुली कडून एक नातही आहे, पण भेटायची उसंत नाही. पत्र हाती देताना “काय ताई कस काय?” असं घोगऱ्या आवाजात विचारपूस करतात. तरी स्वतः मात्र नातीला विडिओ कॉल करावा लागतो. पण ती सोय तरी आहे, हे मात्र खरं. परवा मला म्हणाले अरे हे whatsapp वर फोटो कसा काय जातो दाखवतोस. आई म्हणाली, “बसा, त्याला येतं सगळं, दाखवेल तो, चहा घ्या आधी”. मग मी फोटो क्लिक करून दाखवला, तर म्हणाले असा नाही तो सेल्फी काय तो कसा काढायचा सांग. मी दाखवायला लागलो तोच त्यांनी तोंडाचा चंबू केला. मी म्हटलं अहो असं आजकालच्या पोरी करतात तुम्ही नका करू. ते कावरे बावरे झाले आणि मी मनात कपाळावर हात मारला. नात करून दाखवत असेल त्यांना, दुसरं काय. सेल्फी पाठवल्यावर उगाच खाली लिहावंसं वाटलं, फोटो पाहणाऱ्याने काढणाऱ्यास हसू नये. मी मनात हसलो आणि कोणा बड्या गुरु चं नावं घेताना कान धरतात तसा धरला अर्थात पुलंच्या आठवणीने आणि अर्थात मनात.

मी त्यांना मिश्किल पणे विचारलं, “खाली वाह ताज लिहू?” ते हसले. मग कप खाली ठेवून सांगितलं, “अरे नात माझी काय, काय नवीन कपडे घालून सेल्फी पाठवते मुलीच्या फोन वरून आणि मला पण सांगते, आबा, सेल्फी काढा आणि मला पाठवा, पण मला कुठे जमतंय. आत्ता दाखवलंस तु. बरं केलंस. आज तिचा वाढदिवस आहे, जाता तर येत नाही सेल्फी काढून पाठवतो खुष होईल”.

त्यांचा तो खिशाला पेनाच्या शाई चा डाग पडलेला सेल्फी पाहून मला उगाच चर्रर्र झालं. मी त्यांना बायकोची ओळख करून देत म्हटलं, लग्न होऊन वर्ष झालं पण तुमची भेट नाही झाली. ते हसले, “वा! छान” म्हणाले. मला मात्र भेट नाही झाली म्हणताना मनातून अपराधी पणाची भावना आली. आमच्या दोघांच्याही नोकऱ्या म्हणजे, सकाळी निघुन रात्री उशिरा येणार. मग पोस्टमन कोण कुठला विचारतो कोण. घरी आई वडील आहेत म्हणून त्याला थोडा आसरा. पोस्टऑफिसं सुधारली, पत्रं विमानाने जाऊ लागली तरी पोस्टमन तसेच. मलाही ते बदलु नयेत असंच वाटतं, त्यांच्या तो खाकी शर्ट वरचा डाग पोस्टाने नजर लागू नये म्हणून लावला असावा की काय असं वाटतं.

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.