← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · २८ एप्रिल २०२२ · ३ मिनिटे वाचन

पालथ्या घड्यावर पाणी ?

फेसबुक-इन्स्टा काढून टाकलं

डोक्यात एकच तिडीक गेली आणि फेसबुक ईन्स्टा फोनवरून काढुन टाकले. खूप झाले ते मीम आणि व्हिडीओ. लाईक पर्यंत ठीक होत हो … लोकांना आवडावं म्हणून आपण पोस्ट किंवा फोटो टाकायचो पण आता बिनडोक सारखे ते व्हिडीओ नुसते चाळत बसायचे.

असाच चालत असताना बाजुला एक मला समवयस्क माता आणि तिचा छोटा मुलगा ह्यांचयातला संवाद कानावर आला. “बेटा सी धीस फार्मर, हाउ ही इंज फार्मिंग “ असं म्हणून ती माता बेट्याला युट्यूब वरचा “एजुकेशनल” व्हिडीओ दाखवू पहात होती. बेट्याचं लक्ष्य मात्र बाजूच्या बागेत ओल्या मातीत काड्या खुपसण्यात होतं. तर माता त्याच्यावर वसकली. आता त्या मातेला हे कोण सांगणार की ओल्या मातीत काड्या खुपसण बहुदा त्या व्हिडीओ मधल्या “फार्मर” च्या जास्त जवळचं होत. “एडुकेशनल” व्हिडीओ खूप मिळतील हो, पण दुपारनंतर तापलेल्या झाडांना आणि मातीला पाणी घालताना येतो तो सुवास कसा कळणार.

आज कोणाला स्वतःहुन फिरायला वेळ नाही म्हणून “ट्रॅव्हल वलॉगिंग” चे व्हिडीओ ची चलती आहे. समुद्राच्या पाण्यांत उडी मारल्यावर नाकातोंडात खारट पाणी जातं हे कोण सांगत नाही किंवा दाखवू शकत नाही. त्यापेक्षा आपल्या नद्यांचं पाणी जास्त मजेदार असतं नाही का?

आपल्या समोर स्क्रीन एवढ्या वाढल्यात की “ऑफ स्क्रीन टाईम” ची गरज वाटू लागली आहे. माझ्या लहानपणी टेलिव्हिजनला इडियट बॉक्स ची उपमा देणारे आता तर फिट येऊन पडतील. काळाची गरज म्हणजे ती काय हे ठरवणारे शेवटी आपणचं ना ? चालत्या बोलत्या जवळच्या माणसांपेक्षा स्क्रीन्स जास्त जवळ आल्यात “पर्सनल” झाल्यात. त्यात आम्हाला प्रायव्हसी लागते. उगाच शेजाऱ्यांच्या घरात डोकावून “आज भजी तळल्याचा वास येतोय” असं म्हणण्याचे दिवस गेले.

असो हा उहापोह कशासाठी म्हणून विचाराल तर मी पण कधी कधी “सोशल मेडिया” माध्यमांना कंटाळतो. व्हॅट्सऍप, फेसबुक, एक्स (ट्विटर), युट्युब आणि न्यूज चॅनेल चे तर विचारूच नका. म्हणून काढून टाकले मोबाईल वरून फेसबुक नी इन्स्टा. आई ने सकाळी फोन केला “ताई ने नवीन फोटो टाकलेत बघितलेस का ?” मग लॅपटॉप वर फेसबुक उघडले आणि बाधितले “लाईक” केले…. तास दीड तास कुठे गेला कळलंच नाही…. पालथ्या घड्यावर पाणी ? कि नाही ?