महायुद्ध
आज आमच्या जेवण बनवणाऱ्या ताई लवकर येतो म्हणाल्या. मग बायकोने त्या आल्यावर त्यांना टोमणा मारला रोजच ह्या वेळेला आलात तरी चालेल. त्या खुद्कन हसल्या आणि त्यांनी पण …. सॉरी हां तुमच्या झोपेतून उठवलं तुम्हाला. हा शक्ती तुऱ्याचा जंगी सामना लवकर संपणार नाही हे समजून मी विचारलं ताई चहा घेणार ? बायकोनेही विषय बदलल्यामुळे ऑफिसच्या तयारीत लक्ष केंद्रित केलं.
आता कपाट उघडलेलं. मला टेन्शन आलं. बापरे आता खूप प्रश्न येणार. टीव्ही लावायला पाहिजे. मी पळत बाहेर आलो रिमोट हातात घेतला. नंतर लक्षात आलं ताईंना चहा दिला नाही. परत आत किचन मध्ये धावलो. ओव्हन मधून चहा काढून कपात ओतून ताईंना दिला. माझ्या कपात ओतून मी माझ्यासाठी घेऊन आलो. मी रिमोट हातात धरूनच हे सगळं करत होतो. आता माझं टेन्शन वाढत होतं. मी कप पण हातात घरून असल्याने हळू बाहेर आलो टीव्ही लावणार तेवढ्यात बायकोने थांब टीव्ही लावू नको हे घालू का ते? मला ह्याच प्रश्नच उत्तर कधीच नीट देता येत नाही. जे मला आवडतं ते कधीच मॅचिंग नसतं.
एका दुसऱ्या बाजूला वेगळंच महायुद्ध सुरु होत होत. ते अजून कोणाला कळलं नव्हतं.
माझ्या बायकोला खलनायक आवडतात. बरेच दिवसात कोणी खलनायकावर चित्रपट आलेला नाही. मग मागच्या आठवड्यात बायकोला आठवण झाली, म्हणाली “मला माईन काम्फ परत वाचायची आहे” मग ते हिटलरचे आत्मचरित्र तिने आणलं होत.
आता त्या पुस्तकावर काही कपड्याचा ढीग तिने रचला होता. हिटलरचं तोंड बायकोने एका टी-शर्ट झाकलं होत. त्याचं तोंड जिथे असं झाकलंय तिथे माझी काय मजाल. मला शेवटी एक आयडिया आली “अगं तु ते नवीन ऑर्डर केलेलं आल ना ते ट्राय कर की !?” तिला आवडलं ! चेहरा चमकला !! हिटलरची सुटका झाली !!! मग मी सुटकेचा निश्वास टाकला.
ताईंचं पण जेवण करून झालेलं. त्या घरी गेल्या. बायकोने डबा भरला. टॅक्सी पकडून ती ऑफिस ला गेली. मला असं वाटलेलं कि हि हिटलर सुटला पण नाही त्याच तोंड अजून बंदच होत. टी-शर्ट बाहेर राहिलेला. आता संध्याकाळी त्याची सुटका होणार?