← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · २६ जुलै २०२६ · ४ मिनिटे वाचन

आता उठवु सारे रान

इतके दिवसाची एक सल, जखम बाहेर पडली. हा तरुणांनी केलेला निषेध माझ्या लेखी एक baptism on fire वाटते. हे कोणी शिकवुन मिळत नाही.

साने गुरुजींची एक कविता मी शाळेत असताना शिकलो

आता उठवु सारे रान
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

हे साने गुरुजींना वाटलं असेल तेव्हा खरंच बरीचशी जनता शेतीवर अवलंबुन होती. आताही आहे, पण तंत्रज्ञानात पुढेही गेलो आहोत आपण. पण आता समाजाने अजुन खालचा स्तर गाठला आहे. हे आपण होऊ दिलं. इतक्या खालच्या स्तरावर येईपर्यंत आपण गप्प बसलो.आपल्याच देशाचा मालकी हक्क आपण घेतला नाही. खंत ह्याची वाटते. आपणच स्वतःला स्वातंत्र्य मिळालं आहे ह्यावर विश्वास ठेवला नाही.

जसे सगळे सतत सांगत असतात लोकशाहीचे चार स्तंभ, कोणी उभारून दिले पूर्वजांनीच ना ?
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
न्यायमंडळ
वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमे
या स्तंभांवरती एक माणुस उभा आहे, हे त्यांनी सांगितलेलं का? एक माणुस जो कधी तुम्हाला सकाळचा पेपर आणुन देतो. Swiggy वरून ब्रेकफास्ट आणुन देतो. ड्राईव्ह करून ऑफिस मध्ये सोडतो. ऑफिस कॅन्टीन मध्ये किव्वा बाजूच्या टपरीवर चहा बनवतो. तुम्हाला कामं सांगतो. टाळी देतो आणि पाठीवरून हातही फिरवतो.

एक एक करून हे चारही स्तंभ खिळखिळे झाले की हा माणूस जमिनीवर नाही का येणार? आणि मग रस्त्यावर आलेला माणुस घाबरत नाही. कारण खालचे चारही स्तंभ घायाळ झालेत, जे त्याला आत्तापर्यंत थांबवत होते वा त्याला प्रेरणा देण्याचं काम करत होते. त्यांची डागडुजी थुकपट्टी लावुन होत नसते. ह्यापुढे ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत refactoring of code म्हणतात, ते नाही केलं तर पत्यांच्या बंगल्यासारखं सगळं कोसळतं.

खरं तर आताच्या काळात हे झालंय हे चांगल आहे.जसे काही गंगेला तुमची पापं धुवायला पुर आलाय. जागं होणं कठीण असत. झोपेतील त्यांची तुमची माझी स्वप्ने खूप प्रिय असतात. स्वप्नांतच पुरात जीव गेला तर अशी मानसिक तयारी पण असते.

पण हे तर समाजाचं समुद्रमंथन आहे. जेव्हा हे मंथन चालू आहे, त्यात प्रत्येक राक्षसाने आपले हलाहल प्यावे. ह्याने आत्मा मारत नाही पण राक्षसी वृत्ती संपते. अमृत समोर दिसतंय पण हलाहलाला कवटाळून बसलात, स्वप्नांना कवटाळुन बसलात. तर अमृत बुरशी येऊन संपेल. हे मंथन आधीही झालं होतं, होत राहत आणि पुढेही होईल. कोणी आणि का केलं ह्यापेक्षा लक्षात ठेवायला पाहिजे कि ह्या मंथनातून हालहाल संपवल्यावर अमृत ओसांडून वाहून दारात येईल. त्याचे स्वागत मी करणार. ह्याच विचाराने रात्री प्रोटेस्ट चालु आहे म्हणुन मला शांत झोप लागली.

समाजात अजुनही असा एक वर्ग आहे ज्याला हा तरुणांनी केलेला निषेध कळला नाही. कदाचित काहींना हे निषेध करणे असामाजिक पण वाटले असेल. ह्यासाठी मला दोन कारणे वाटतात. तथाकथित बुद्धिजीवींना वाटतं त्याना जास्त कळतं, ह्यात मीही आलोच आणि दुसरे म्हणजे अंधभक्त. ह्या मुख्यतः आत्ममग्न किंवा आत्ममुग्ध व्यक्ती आहेत. “मी” म्हटले कि थोड्या का होईना प्रमाणात आत्ममुग्धता येतेच. आश्या व्यक्ती एका प्रतिध्वनी कक्षात ( echo chamber ) मध्ये जगतात. बाहेरच्या जगातही त्यांना आपल्या आवाजाशिवाय काही ऐकु येत नाही. ह्माझ्याही मेंदूला ही किड अधुन मधुन लागते.
आत्मपरीक्षण एकट्याने नाही कोणाला बरोबर घेऊन करावे. गुरु, मित्र, बायको, पुस्तके हे आपल्याला असे महानुभाव आत्मपरीक्षणात साथ द्यायला उत्सुक असतात. हे आत्मपरीक्षण एकट्याचे नव्हे. ह्यातून प्रबोधन होत असते आणि जेव्हा स्वतःच्या प्रबोधनातून उन्नती होते तेव्हाच … अगदी त्याच वेळी समाजही उन्नत होतो.कोणीतरी भेटतो जो दुजोरा देतो. जादू झाल्यासारखी वाटते. आणि ह्या जादूची मजा काही और असते. जादू म्हणा किंवा निषेध, उद्रेक अथवा सामाजिक जागृती.

मला गर्व आहे की मी हा निषेध प्रत्यक्ष दर्शी पाहतोय. आता मागे फिरायचं नाही. हातात अमृताचा पेला आहे पण झोपून पुन्हा स्वप्नात जाऊ नका.
ही प्रार्थना ईश्वरचरणी मुळीच नाही.

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.